संदेश …!!
महाराष्ट्र राज्य हे देशातील सहकार चळवळीच्या संख्यात्मक व गुणात्मक वाटचालीमध्ये अग्रेसर राज्य असून भारतीय राज्यघटनेच्या 97 व्या घटनादुरूस्तीने देशातील सहकार चळवळीमध्ये दिर्घकालीन गुणात्मक व सकारात्मक परिणाम करणाऱ्या दुरूस्त्या संमत करण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्य घटनेतील सुधारणेनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांची संचालक मंडळाची, पदाधिकाऱ्यांची व संचालक मंडळातील नैमित्तीक रिक्त पदांची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मोकळ्या व भयमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्याकरिता “राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरण ” ही स्वायत्त यंत्रणा गठीत करण्यात आलेली आहे.
राज्यात मार्च २०१९ अखेर, प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली निवडणुकीसाठी कार्यरत सुमारे 99,405 सहकारी संस्था व ३०७ कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुका घेण्याची वैधानिक जबाबदारी प्राधिकरणावर सोपविण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कब( 1 ) नुसार मतदार यादीचे अधीक्षण , संचालन व नियंत्रण प्राधिकरणाने करावयाचे आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम घोषित करणे ,प्रत्यक्ष मतदान घेणे, निवडणुकीदरम्यान आचार संहितेचे पालन केले जाते किंवा नाही याची तपासणी करणे, या सर्वाची जबाबदारी प्राधिकरणावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक ) नियम 2014, चे नियम 6 नुसार मतदार याद्या प्राधिकरणाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. त्यानुसार प्राधिकरणाचे संकेतस्थळ विकसित केले असून निवडणुका पार पाडताना आवश्यक असणारी सर्व माहिती, कार्यालयीन सूचना, आदेश , परिपत्रके आणि मार्गदर्शक सूचना तसेच राज्यातील सर्व सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचे अनुषंगाने सर्व टप्पे व माहिती आणि अद्ययावत सांख्यिकी माहिती एकाच वेळी संकेतस्थळावर दिसून येणार आहे याचा लाभ सहकारी संस्थांचे व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व सभासद व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी, तालुका सहकार निवडणूक अधिकारी यांना होणार आहे . तसेच प्राधिकरणाला निवडणुकांवर नियंत्रण ठेवणे सुकर होणार आहे.
सदरचे संकेतस्थळ तयार करणेकरिता प्राधिकरणाचे सचिव श्री यशवंत गिरी, सह सहकारी निवडणूक आयुक्त श्री मिलिंदसेन भालेराव, श्री वसंत पाटील तसेच उप सहकारी निवडणूक आयुक्त श्री.सच्चिदानंद नायकवडी, श्रीमती बकुळा माळी आणि प्राधिकरणातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सदरचे संकेतस्थळ तयार करण्यामागील योगदान उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे .
सहकारी संस्थांचे व कृषी उत्त्पन्न बाजार समित्यांचे सर्व सभासद , निवडणूक निर्णय अधिकारी , प्राधीकृत अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणारे सर्व घटक,अधिकारी,कर्मचारी यांचेकरीता हे संकेतस्थळ विकसित करण्याचा हेतू यशस्वी व सफल होईल अशी मला निश्चित खात्री आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य, पुणे