निवडणूक अधिकाऱ्याने सहकारी संस्थांच्या / कृ.उ.बा.स. च्या निवडणूकां पारदर्शक वातावरणात पार पाडताना, त्या मोकळया आणि योग्य पद्धतीने पार पाडतील याची खात्री करणे अपेक्षित आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी :-
“जिल्हा निवडणूक अधिकारी” याचा अर्थ, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पर्यवेक्षणाखाली व नियत्रंणाखाली, जिल्हयातील किंवा प्रदेशातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकां घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला त्यांची कार्य पार पाडताना सहाय्य करण्याकरीता, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे पेक्षा कमी दर्जा नसेल, असा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेला किंवा मान्यता दिलेले अधिकारी, असा आहे.
जिल्हयातील कृ.उ.बा.स. च्या निवडणूका घेण्याकरीता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संबंधित जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना “जिल्हा निवडणूक अधिकारी” म्हणून घोषित केले आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी :-
“जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी” याचा अर्थ, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पर्यवेक्षणाखाली व नियत्रंणाखाली, जिल्हयातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे त्यांचे कार्य पार पाडताना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला सहाय्य करण्याकरीता, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे पेक्षा कमी दर्जा नसेल, असा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेला किंवा मान्यता दिलेले अधिकारी, असा आहे.
प्रत्येक जिल्हयाचे, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी, प्राधिकरणाच्या अधिक्षण, नियंत्रण व निर्देशणाखाली, ज्या सहकारी संस्थांचे नोंदणीकृत कार्यालय त्यांचे जिल्हयात आहे अशा सर्व सहकारी संस्थांची मतदार यादी तयार करणे व निवडणूकां पार पाडण्याकरीताच्या सर्व कामकाजात समन्वय व देखरेख ठेवील. वरीलप्रमाणे नमुद केल्यानुसार मतदार याद्या तयार करणे आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सोपविण्यात आलेल्या निवडणूकां पार पाडताना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी त्याला प्रदान केलेल्या अशा अधिकारांचा वापर करेल आणि आवश्यक अशी इतर कार्ये पार पाडेल.
तालुका किंवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी :-
“तालुका किंवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी” याचा अर्थ, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या देखरखीखाली व नियत्रंणाखाली असलेला, तालुक्यातील किंवा प्रभागातील सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्याच्या दृष्टिने, सर्व कार्य पार पाडील, असा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेला अधिकारी, असा आहे.
निवडणूक निरिक्षकांची कार्ये / भूमिका :-
- नामनिर्देशन प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- नामनिर्देशन पत्र मागे घेणेच्या प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- मतदानापुर्वी उमेदवाराचे निधन झाल्याच्या खात्री अंती मतदानाबाबत नि.नि.अ.यांनी प्रत्यादेश दिल्याची बाब प्राधिकरणास अवगत करणे.
- मतदानपुर्व व्यवस्थापनाचे निरिक्षण करणे.
- मतदानावेळी वापरण्यात येणारी अंतीम मतदार यादी व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी / तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांनी अंतीम केलेली मतदार यादी एकच आहे किंवा कसे, याची खात्री करणे.
- मतदान प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- मतमोजणी प्रक्रियेचे निरिक्षण करणे.
- आचार संहिता अंमलबजावणीचे निरिक्षण करणे.
- निवडणूकी दरम्यान भ्रष्टाचार आणि निवडणूक विषयक अपराधा संदर्भात प्राधिकरणास अवगत करणे.
- कायदा व सुव्यवस्था यांचे व्यवस्थापन करणे.
- निवडणूक प्रयोजनार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना मतदान व मतमोजणी अनुषंगाने आवश्यक प्रशिक्षण दिले आहे किंवा कसे, याची खात्री करणे.
- निवडणूक विषयक उपरोक्त माहिती प्राप्तीनंतर फिरती कार्यक्रम तयार करुन जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी, नि.नि.अ.यांना अवगत करणे.
- निवडणूक प्रक्रियेचे निरिक्षण करुन विहित नमुन्यातील अहवाल विशिष्ट कालावधीनंतर प्राधिकरणास सादर करणे.
निवडणूक निर्णय अधिकारी :-
“निवडणूक निर्णय अधिकारी” याचा अर्थ, सहकारी संस्थां / कृ.उ.बा.स. च्या निवडणूका पार पाडण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नियुक्त केलेली किंवा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने यासंदर्भात प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने नेमणूक केलेली व्यक्ती, असा आहे. कोणत्याही निवडणूकीत महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 / महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम 2017 आणि सहकारी संस्थेने / बाजार समितीच्या मंजुर उपविधी यामध्ये तरतुद केलेल्या रितीने कार्यक्षमपणे आणि प्रामाणिकपणे निवडणूक घेण्यासाठी आवश्यक असतील अशी सर्व कृती आणि गोष्टी करणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे सर्वसाधारण कर्तव्य असेल.
निवडणुक निर्णय अधिकाऱ्याची कार्ये / भुमिका :-
- निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या, पुर्वमान्यतेच्या अधिन राहुन निवडणूक घेण्याचे संपूर्ण वेळापत्रक तयार करेल आणि प्रसिद्ध करेल.
- प्रत्येक मतदान केंद्राकरीता निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करेल.
- प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा / तालुका सहकारी निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेशी विचारविनिमय करुन, पुरेशा मतदान केंद्राची व्यवस्था करील.
- संस्थेच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी विहीत मुदतीत निवडणूक घेण्याच्या उद्देशाने, कार्यक्रमांची दिनदर्शिका संस्थेच्या / कृ.उ.बा.स. च्या आणि जर असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आणि जिल्हा / तालुका सहकारी निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे सुचना फलकावर प्रसिद्ध करील.
- कोणत्याही निवडणूकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे या नियमांत विहीत केलेल्या पद्धतीने निवडणूका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर कृती व गोष्टींसोबत खालील गोष्टी करणे हे त्यांचे सर्वसाधारण कर्तव्य असेल.
- नामनिर्देशन पत्र मागविणे.
- नामनिर्देशन पत्र स्विकारणे आणि छाननी करणे.
- निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करणे.
- निवडणूकीस पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. (अंतिम यादी)
- मतदान केंद्रांची व्यवस्था करणे.
- मतदान अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी व्यवस्था करणे.
- मतपेटीची व्यवस्था करणे.
- मतपत्रिका छपाईची व्यवस्था करणे.
- आवश्यक असल्यास वेगवेगळया मतदान केंद्रांच्या निकालांचे संकलन करणे.
- निवडणूकीचा निकाल जाहिर करणे आणि त्याबाबतचे निवडणूक प्रमाणपत्र देणे.
- मतदान अधिकाऱ्यांकडुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास निवडणूकीच्या संदर्भात कागदपत्रे मिळतील.
- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी आपले कर्तव्य बजावताना आवश्यकता असल्यास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदान अधिकारी यांचीही मदत घेऊ शकतात.
- आपल्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही सहकारी संस्थेच्या / कृ.उ.बा.स. च्या निवडणूकीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा प्रशासनासोबत संपर्क ठेवेल.
- प्राधिकरणाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पुणे यांना अहवाल पाठवितील किंवा विवरणपत्रे सादर करतील.
- निकाल जाहिर झाल्यापासुन सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित निवडणूक कागदपत्रे संस्थां / कृ.उ.बा.स. यांच्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या ताब्यात राहतील. त्यांनतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण किंवा कोर्टाने दिलेल्या कोणत्याही निर्देशांच्या अधीन राहुन कागदपत्रे नष्ट केली जातील.
- निवडणूक निर्णय अधिकारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने वेळोवेळी सोपविलेली अशी इतर कामे पार पाडतील.
मतदान केंद्राध्यक्ष :-
“मतदान केंद्राध्यक्ष” याचा अर्थ, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणूक घेण्याकरीता नेमलेली कोणतीही व्यक्ती असा आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मतदान योग्य प्रकारे होत आहे हे पाहणे, हे मतदान केंद्राध्यक्षाचे सर्वसाधारण कर्तव्य असेल. या नियमाच्या कोणत्याही प्रयोजनासाठी नियुक्त केलेले मतदान केंद्राध्यक्ष, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण किंवा याबाबतीत ते प्राधिकृत करतील असा अधिकारी यांच्या सुचनेनुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सर्वसाधारण मार्गदर्शन, देखरेख आणि नियत्रंण यानुसार काम करतील.
मतदान अधिकारी :-
“मतदान अधिकारी” याचा अर्थ, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतदान केंद्राध्यक्षास मदत करण्यासाठी नेमलेली कोणतीही व्यक्ती, असा होतो. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षास त्याची कामे पार पाडण्यात मदत करणे हे मतदान केंद्रावरील मतदान अधिकाऱ्याचे कर्तव्य असेल. या नियमाच्या कोणत्याही प्रयोजनासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण किंवा याबाबतीत ते प्राधिकृत करतील असा अधिकारी यांच्या सर्वसाधारण मार्गदर्शन, देखरेख आणि नियत्रंण यानुसार काम करतील.